श्रीकृष्णनगरात ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर

Foto
शहरातील महत्वाच्या भागातील एक असलेल्या टी.व्ही. सेंटर परिसराचा वॉर्डात समावेश होतो. वॉर्डामध्ये श्रीकृष्ण नगर, सुभाष चंद्र बोस नगर, संजय गांधी मार्केट व काही सोसायटीचा समावेश होतो. या भागात शहरात येणारे अनेक दिग्गज नेते भेट देत असतात. तरी देखील वॉर्डातील अनेक समस्या मार्गी लागू शकल्या नाहीत. वॉर्डातील मुख्य समस्या ड्रेनेजची आहे. अनेक ड्रेनेज चॉक अप आहेत. टी.व्ही. सेंटर पोलीस चौकी शेजारीच असलेली ड्रेनेज लाईन देखील दुरुस्त नाही. त्यातील घाण पाणी रोड वर सतत वाहत असते. हे घाण पाणी थेट संजय गांधी मार्केट(टी. व्ही. सेंटर भाजी मंडई)मध्ये जाते. त्यामुळे भाजीपाला विक्रेते व खरेदीसाठी येणारे नागरिक दुर्गंधीने त्रस्त असतात. त्याचबरोबर चालण्याचा प्रश्न देखील निर्माण होतो. सुरवातीला काही अंतर्गत रस्त्यांची कामे झाली. इतर भागात राहिलेले रस्ते आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पाच दिवसाआड येणारे पिण्याचे पाणी सुद्धा अवेळी येते. कचरा प्रश्न शहरभर गाजत असताना टी. व्ही. सेंटर मैदानावर कचरा जाळण्याचे प्रकार मनपा प्रशासनाकडून सुरू झाले ते आजवरही थांबलेले नाहीत. वॉर्डात असलेल्या वाहतूक मैदान, फरशी मैदानावर अनेक तळीराम व कॉलेजचे तरुण अनेक व्यसने करताना दिसतात. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. वॉर्ड प्रकाशमय करण्यासाठी लावण्यात आलेले एलईडी लाईट्स काही ठिकाणीच दिसतात. इतर ठिकाणी असलेले पथदिवे हे जुनेच आहे, त्यामुळे इथला एलईडी व याचा निधी नेमका गेला कुठे ? हा प्रश्न उपस्थित राहत आहे. नगरसेविका काम करण्यास कधीच उपलब्ध नसतात, अशी ओरड बहुतांश नागरिक करत होते.

वॉर्डातील ६० टक्के ड्रेनेज लाईन्स करण्यात आल्या
मनपात निधी नाही हे माहीत असल्याने कंत्राटदार ड्रेनेज कामाचे टेंडर घेत नाहीत. तरीदेखील वॉर्डातील ६० टक्के ड्रेनेज लाईन्स करण्यात आल्या. मैदानावर बसणारे तळीराम आता खूप कमी झाले आहेत. पोलिसांची गस्त वाढवली आहे. कचरा प्रश्न निर्माण झाला फक्त त्याकाळात मैदानांवर कचरा डम्प केला गेला. आता तसे होत नाही. अनेक अडचणींना सामोरे जात शक्य तेवढी जास्त कामे मार्गी लावली आहेत. 
- शोभा वळसे, नगरसेविका

नगरसेविका हरवल्या आहेत. त्या इथल्या स्थानिक नाहीत लोकांनी त्यांना पाहिलेले नाही.कामे केली नाही आणि जी केली ती सगळी दर्जाहीन केली. संपूर्ण कार्यकाळात ड्रेनेज ही एक समस्या सोडवता आली नाही. 
- युवराज गवई, नागरिक

ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर नेहमी वाहते. दुर्गंधीचा त्रास होतो. ग्राहक भाजी माल घेण्याकरिता येण्यास घाबरतात. आमचा माल चांगला असून देखील या ड्रेनेजच्या पाण्यामुळे लोक भाजी खरेदी करत नाहीत. 
- सुरेखा गुप्ता, भाजी विक्रेत्या

कचरा गाडी येताच संपूर्ण भरून जाते. तो गाडीवाला मैदानावर जाऊन कचरा टाकतो आणि पुन्हा येतो. मैदान आमचेच आहे कचरा बाहेर का जात नाही ? वॉर्डात एका ठिकाणाहून कचरा घेऊन वॉर्डात दुसऱ्या ठिकाणी टाकला जातो. 
- तांबे मामा, नागरिक

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker